तीन गझला : रमेश मंमाळे

 




१.


वावरी नांदतो गोकुळासारखा

बाप माझा मला केशवासारखा


रंग काळा जरी वावरासारखा 

बाप रानी उभा विठ्ठलासारखा   


मोकळ्या अंगणी थाटला उंबरा 

बाप हो आसरा अंबरासारखा


रान हिरवे करी जीवनाचे सदा 

वाहतो बारमाही नद्यासारखा 


या पशू पाखरा रानवेली फुला 

बाप लावी लळा पावसासारखा 


लाख लाटा उरी धावल्या नाचल्या 

शांत तो राहतो सागरासारखा 


हर्ष व्हावा सदा माय बापा असा 

बाळ श्रावण घरी जन्मल्यासारखा


काळजीने मुली हात हातात दे 

बाप नाही पुन्हा भेटण्यासारखा 


२.


प्रेमाने करा संसार मामा

आनंदी करा घरदार मामा 


चर्चा चालली गावात साऱ्या 

झाले आवडीचे फार मामा 


आकाशी नको संचार मामा 

आहे छान जोडीदार मामा 


सोने आणि चांदी ना फुलांचा 

मामीचा खरा शृंगार मामा 


सांभाळा मुलांना काळजीने 

आले पीक दाणेदार मामा 


नात्याचा पसारा फार मोठा 

वेलीचा सदा आधार मामा  


बापा माग पक्का सातबारा 

स्वप्नांना करी साकार मामा 


दीर्घायुष्य लाभावे तुम्हाला 

मंगल कामना स्वीकार मामा 


३.


देठास वेदनेच्या होऊन फूल यावे 

काट्यावरी सुखाने आयुष्य घालवावे 


डोळ्यांत आसवांचे मकरंद साचताना     

श्वासात या जगाच्या राहून दरवळावे


डोक्यावरी उन्हाचे आभाळ पेलताना

होऊन सावली तू मातीस पांघरावे


 गर्भात सागराच्या राजीव जन्म घेता 

पाहून दुश्मनांनी आतून उंबळावे 


दारात वादळांचे काहूर माजताना 

सरितेस पर्वताने छातीस पाजवावे  


पेरून बीज ऐसे जावे जगात साऱ्या 

जेथे पडेल तेथे माणूस अंकुरावे..

.........................................................



2 comments:

Anonymous said...

Very nice 👍

Anonymous said...

खूप सुंदर रचना