तीन गझला : कांचनगंगा मुरलीधर मोरे

 




१.


सडा पाहुनी प्राजक्ताचा मी दरवळते 

क्षणिक सुगंधी समर्पणाने मन गहिवरते


मुक्त भरारीसाठी जर मन अधीर आहे

पाउल माझे उंबरठ्याशी का अडखळते


दुःख मनाचे जरी सांगते तुला विठ्ठला

व्यथा ऐकुनी रखुमाईची मी हळहळते


तुझ्या बळावर पिल्लू घेते उंच भरारी 

रिक्त पोकळी घरट्याची का तुला रडवते 


दात दिले पण चणे विसरला जेव्हा ईश्वर 

नियतीचा हा डाव नव्याने मी ओळखते 


२.


एकांताशी सूर जुळवणे जमले नाही 

गर्दीसाठी सभा भरवणे जमले नाही 


अंधाराला दूर कराया पणती झाले 

सूर्याची मी वंशज म्हणणे जमले नाही 


शल्य बोचरे मनात ठेवत घरपण जपले 

नात्यांमधली वीण उसवणे जमले नाही 


स्वप्न जरीही कधीच हाती लागत नाही 

स्वप्नाविन हे जिवन घडवणे जमले नाही 


जरी परीक्षा घ्यायचीच तर घे तू नशिबा 

पण आशेचा दिवा विझवणे जमले नाही


३.



मुठीतल्या या काजव्यास मी सूर्य म्हणावे म्हणते

प्राक्तनातल्या अंधाराला दूर करावे म्हणते


राखेमधला एक निखारा अजून हसतो तेंव्हा 

आभाळाला भिडण्यासाठी फिनिक्स व्हावे म्हणते 


माझ्यामधली मीच अचानक कधी हरवते तेंव्हा 

शिल्प स्वतःचे पुन्हा नव्याने मी घडवावे म्हणते


कोणी नाही इथे कुणाचा जो तो म्हणतो आहे 

नात्यांमधले दिव्य समर्पण मीच जपावे म्हणते


आयुष्याच्या संध्याकाळी एकाकीपण छळते 

उरलेल्या श्वासात विठ्ठला तुला पहावे म्हणते

...................................................................

No comments: