तीन गझला : डॉ.स्नेहल कुलकर्णी 'दिशा'

 



१.


एकाएकी मौनव्रताचा विचार मारू शकते 

किर्र शांतता कातरवेळी टाहो फोडू शकते


विद्या कुठली प्राप्त न करता राज्य मनावर करते 

ध्यान म्हणावे... इतकी माझी तंद्री लागू शकते 


देह अमंगल वाटू शकतो आत्मा निर्मळ असतो 

वेश्यासुद्धा सुशीलतेचा विचार मांडू शकते 


तिच्या मागच्या वागणुकीचे नका दाखले देऊ 

काळाची नस ओळखून ती उलटे वागू शकते


लाट त्सुनामीची बघताना मला एवढे कळले 

पाणीसुद्धा आभाळाची फिरकी घेऊ शकते 


तिच्या कौतुकाने खुलताना याची भीती असते 

हरले तर... माझ्याशी आई कठोर बोलू शकते 


ती विश्रांती घेते आहे पण बेसावध नाही 

'दिशा' वादळाला केव्हाही माती चारू शकते


२.


हसू घेतले जर हिरावून माझे 

कसे दुःख यावे तरारून माझे 


सुखाला तुझ्या लागली कीड थोडी 

दिले दोन अश्रू फवारून माझे 


किती हट्ट करतोस तू सावलीचा

कुठे सांग लपवायचे ऊन माझे


हिरा शोधताना तयारी असावी

बघा कोळसेही तपासून माझे


भितीने तुझ्या की तुझ्या सोबतीने

पुन्हा अंग आले शहारून माझे


कदाचीत व्यापेल 'तो' भाग अर्धा

नका चित्र काढू समोरून माझे


इथे जन्मलेला इथे श्वास घेतो

निघाला कुठे गाव सोडून माझे


तिचा हात सोडून स्वप्नात रमले

'दिशा' चालली जग झुगारून माझे


३.


अंतर जमेल तितके माझ्यातुझ्यात ठेवू

जवळीक साधणाऱ्या वाटा हयात ठेवू


भडका उडेल का... ही चिंता हवी कशाला?

वाऱ्यात कंदिलाची विझवून वात ठेवू


मी उलगडेन तेथे आयुष्य वाल्मिकींचे 

व्याख्यान एक माझे कारागृहात ठेवू


मृगजळ बघून त्याच्या जे धावतात मागे

स्पर्धा तहानल्यांची भर पावसात ठेवू


थोडे तरी जवळ मग करतील टाळणारे 

सांगू सुखे जगाला दुःखे मनात ठेवू 


सगळीकडे बरोबर कोणीच येत नाही 

गेली 'दिशा' पुढे तर... पत्ता खिशात ठेवू

..........................................................

No comments: