१.
वक्तशिर असणे तिचे आघात करते
प्रेम सुद्धा फावल्या वेळात करते
भेटते क्रेडीट ज्योतीला परंतू
आत्महत्या तर दिव्याची वात करते
बाप नांगरतो उभे आयुष्य अपुले
धावपळ आई उन्हातानात करते
उधळली काडी न् काडी वादळाने
पण तरी किलबिल कुणी कानात करते
ओरबडतो रातराणीला जमाना
मी म्हणुन बाभुळ उभी माझ्यात करते
जन्म माझा बांधला आहे उन्हाशी
येरझारा सावली स्वप्नात करते
२.
कुठली परंपरा ही, कुठला प्रघात आहे
राखीव कोंडमारा, स्त्री जीवनात आहे
छाया उभ्या जगावर, मी झाकली जरीही
माझ्याच सावलीची, जागल उन्हात आहे
जन्मास बिलगलेला, कायम तिच्या उन्हाळा
श्रावण तिने तरीही, जपला मनात आहे
टोचून बोलतो अन्, अपमान रोज करतो
पुरुषार्थ फक्त इतका, उरला तुझ्यात आहे
दु:खास चाल लावुन, केले सुरेल गाणे
आयुष्य त्यामुळे हे, तालासुरात आहे
मी काळजास माझ्या, केले स्मशान आता
गाडून कैक इच्छा, माझ्या उरात आहे
मी आड येत आहे माझ्या जमानतीच्या
माझ्यामुळे जणू मी कारागृहात आहे
३.
पांगली गर्दी जरी रस्त्यातली
थांबुनी डोक्यात होत्या दंगली
अनुभवाने सांगते आहे मुली
सोसण्याची सवय नाही चांगली
लपविण्यासाठी खुजेपण आपले
भोवतीची उंच झाडे कापली
जात नाही मी तिला आता शरण
ही उदासी त्यामुळे कंटाळली
केवढी आतूर होती कालही
आजही ती ओढ नाही आटली
जागजागी रोखल्याने ती नदी
अंगही चोरून आहे चालली
अत्तरांना ही सुगंधी थोरवी
ठार केल्यावर फुलांना लाभली
.................................................

2 comments:
व्वाह.. अप्रतिम..!🙏
खूप छान अतिशय सुंदर
Post a Comment