१.
कशी अन्याय सरल्याची कुठेही बातमी नाही
कशी माणूस जगल्याची कुठेही बातमी नाही!
नवा इतिहास लिहिण्याची पुन्हा चर्चा सुरू झाली
जुना इतिहास स्मरल्याची कुठेही बातमी नाही
करत सत्ता जरीही ठाम दावा रोज असते पण
भुकेची आग विझल्याची कुठेही बातमी नाही
इथे आवाज उठल्याची दिसे चौकात गर्दी ही
तरी सत्ता बदलल्याची कुठेही बातमी नाही
विजयच्या क्रांतिकारी आणि विद्रोही मशालींनी
व्यवस्था दुष्ट जळल्याची कुठेही बातमी नाही
किती चालायची गर्दीत दुनियेला सवय झाली
कुणी रस्ता बदलल्याची कुठेही बातमी नाही
रयत सर्वस्व असणाऱ्या तुझ्या देशामधे राजा
कुणाचे कर्ज फिटल्याची कुठेही बातमी नाही
ठळक मथळ्यात आहे बातमी पेपरफुटीची पण
गुन्हेगारास धरल्याची कुठेही बातमी नाही
किती अधिवेशनांच्या ऊरबडव्या बातम्या आल्या
जनांचे प्रश्न सुटल्याची कुठेही बातमी नाही
२.
सत्तेस प्रश्न केला आवाज दाबल्यावर
रस्त्यात मात्र लाखो विद्रोह जागल्यावर
शेतात राख झाली स्वप्ने उभी पिकांची
अनुदान पत्र आले हंगाम संपल्यावर
ढग रोज येत होते आशा उरी पिकवुनी
डोळेच पूर झाले आभाळ फाटल्यावर
कर्जात जन्म झाला कर्जात अंतही पण
अहवाल पूर्ण झाला देहास टांगल्यावर
दडपू नको व्यवस्थे आवाज माणसांचा
क्रांती घडून येते अन्याय वाढल्यावर
३.
पुन्हा तो यार-दोस्तांचा थवा दिसणार आहे का?
पुन्हा मैफील कट्ट्यावर तशी जमणार आहे का?
किती गोदीत बसलेले कलमधारी मुखवट्यांचे
खरे बोलायला कोणीतरी उरणार आहे का?
किती झेंडे बदलले पण गुलामी संपली नाही
नवा मालक मिळाल्याने कुणी हसणार आहे का?
जुन्या मालास विकण्याला नवे बाजार भरलेले
मशालीतील तो विस्तव कुठे उरणार आहे का?
किती पेरून खोटे सत्यता लपणार आहे का?
नवा इतिहास पेपरवर असा घडणार आहे का?
तुझ्यावाचुन ऋतू जगण्यातले ओसाड झालेले
पुन्हा हृदयात माझ्या मोगरा फुलणार आहे का?
कितीही वादळे आली जरी आयुष्य मावळले
तुझ्या डोळ्यातला विश्वास पण विझणार आहे का?
जुन्या मित्रात बसताना हसू ओघात येते रे
तसे निष्पाप वेडेपण पुन्हा असणार आहे का?
उणे आयुष्य गेले रे मने सांधून जगण्याला
विजय तुटल्यावरी नाते कुणी जपणार आहे का?
......................................................................

No comments:
Post a Comment