१.
आपण सगळे मिळून सुंदर फतवा काढू आनंदाने
जाती अन् धर्माच्या भिंती मिळून पाडू आनंदाने
ज्यांच्याकडची गोष्ट एकही, उतरत नाही सत्त्यामध्ये
त्या सगळ्यांचे जाहिरनामे टर टर फाडू आनंदाने
परजातीच्या पोट्टीचाही, स्विकार करुया पोरासाठी
अन् नांदाया तशीच अपुली पोट्टी धाडू आनंदाने
भोवत आहे प्रत्येकाला, सदैव तो जो जात रकाना
त्यास गड्यांनो कायमसाठी जित्ते गाढू आनंदाने
आपआपुल्या, काळजातला 'अवगुण कचरा' झाडायाला
आपआपल्या हाती आपण घेऊ झाडू आनंदाने
२.
अंधार मातलेला, दिसतोय आज येथे
विश्वास गाडलेला दिसतोय आज येथे
जो वृक्ष पाहिजे तो, मिळणे कठीण झाले
बेमान वापलेला दिसतोय आज येथे
बिलगून हर ठिकाणी, फलकास स्वच्छतेच्या
कचराच साचलेला दिसतोय आज येथे
चौकामधील पुतळा, पाहून चित्र ओंघळ
गचगार थांबलेला दिसतोय आज येथे
काळोख वाढलेला, जगतास सांगणारा
आवाज दाबलेला दिसतोय आज येथे
सत्यासवेच जगणे, करतो पसंत त्यावर;
अन्याय लादलेला दिसतोय आज येथे
असलीस न्याय आणिक, सन्मान द्यायचा तर;
हमखास टाळलेला दिसतोय आज येथे
३.
पुन्हा कशाला जन्मा घालू मनात माझ्या इच्छेला?
आणि कशाला करू उभे मी उन्हात माझ्या इच्छेला?
ज्यांच्यासाठी जीव तळमळे, तेच उण्यावर उठले तर;
कोणासाठी लढण्या सांगू रणात माझ्या इच्छेला?
जीव तुझ्यावर जडून गझले, तुला न ध्यानी आल्यावर
व्यक्त कशाला करू कुठेही जनात माझ्या इच्छेला?
जिथे दिसेना मला शक्यता, माती ओली होण्याची
कशास पेरू त्या मातीच्या कणात माझ्या इच्छेला?
रस्त्यावरची लबाड गर्दी, मला न पटते आहे तर;
का रमवू त्या काटाळांच्या बणात माझ्या इच्छेला?
........................................................................
No comments:
Post a Comment