तीन गझला : सारिका देशमुख

 



१.


काळजाला लागलेला घाव आहे

वेदनांचा सोसलेला भाव आहे


चालताना लागला होता किनारा

जीवनाची चालणारी नाव आहे


बोलणारे शांत झाले आज काही

बोलणाऱ्या पोपटाला वाव आहे


का पहावे या नभाच्या चांदणीला

मांडलेला जीवनाचा डाव आहे


साथ नाही लाभलेली सारिकाला

भोवती जमला जरीही गाव आहे


२. 


काय सांगू वेदनेचा अंतरंगी वास आहे

जीवनाच्या याचिकेला भावनांचा भास आहे


मीच माझी राहिले ना या घडीच्या जीवनाला

सोसलेल्या यातनांचा का इथे मग त्रास आहे


डाव सारा मोडला हा सोसताना वादळांना

जिंकण्याची या मनाला लागलेली आस आहे


चालताना लाभलेला माणसांचा संग येथे

अंतरंगी नांदणारा तूच माझा श्वास आहे


जीवनाचे सार माझ्या लेखणीची धार व्हावी

आठवांना गुंफण्याचा लागलेला ध्यास आहे


३.


हाक माझ्या जीवनाची नाव तू

दे नव्याने सोबतीला गाव तू


फार झाले खेळ नियतीचे पुन्हा

कर कृपा आता मलाही पाव तू


वेदनेचा अंत कर तू सावळ्या

पामराच्या संकटाला धाव तू


ठेव त्याला भोवताली नेहमी

झाड दारी आठवांचे लाव तू


यातनांनी फार छळले जीवनी

सर सुखाची पांडुरंगा दाव तू

...........................................


No comments: