१.
हे पात्र नदीचे सुशांत, अवखळ नाही
जगण्यात अता कुठलेही वादळ नाही
आयुष्य कधी थांबते का कुणासाठी?
हृदयात जराही तसली खळबळ नाही
तू ठेव तिथे लपवून तुझी गाऱ्हाणी
सरकार म्हणे आम्हाला कळकळ नाही
बाईस विचारा काय पाहिजे आहे ?
गावात तिच्या मुक्तीची चळवळ नाही
की मूग गिळावे आणि मूकच रहावे ?
मी त्यांच्या इतकी मुळीच सोज्वळ नाही
२ .
मी मानले स्वतःला गंधाळता धुलीकण,
सारे समग्र जीवन केले तुलाच अर्पण
त्या पावसात जाता, वारा मुजोर झाला,
सारे ऋतू सुखाचे मी ठेवलेत तारण !
गेल्या बुजून तेव्हा साऱ्या वसंतवाटा,
मग शुष्क भावनांनी केली पुन्हा भलावण !
नाही, नको म्हणाले घेण्यास उंच झोका,
आकाश चांदण्याचे त्याने दिलेच आंदण !
आल्या फुलून बागा, वणवा विझून जाता,
आयुष्य सांजवेळी झाले कसे विलक्षण !
३.
काल सूर्यास आमंत्रणे धाडली
आज वाटे मला की, हवी सावली
दूर जाऊन जवळीक साधू नको
मी तुझी बालपणची सखी शाल्मली
त्याच वाटेवरी कोण भेटेल का
पापणी सांजवेळेस ओलावली
का असे वाटते प्रेम लाभेलही
रेष हातावरी ती नसे चांगली
तू मला काय देणार आता सखी
व्यर्थता ज्या जिथे नित्य चौफेरली
मैत्र याला म्हणावे कसे सांग ना
या इथेही पुन्हा तू तशी वागली
बाग बहरेल आता कशी या पुढे?
बघ विषारी बियांची तणे माजली
..............….................................

2 comments:
👌👌👌सुरेख...
खूप खूप धन्यवाद! शुभ दसरा ❄️
Post a Comment