तीन गझला : कालिदास चवडेकर

 




१. 


एकसारखी घुसमट होते आहे 

आयुष्याची फरफट होते आहे


तीच ती जुनी दुःखे नशिबी माझ्या

जगणेदेखिल कळकट होते आहे


किती साचते आहे धूळ निरंतर 

काच मनाची धुरकट होते आहे


त्याच विनोदांवरती दात विचकणे 

हसणेसुद्धा पांचट होते आहे


भूक कशाची नक्की माहित नाही 

खाणे अरबट चरबट होते आहे


थेट जरा त्या मुद्द्यावरती बोलू 

तुझे बोलणे लांबट होते आहे


२.


अस्ताव्यस्त पसारा झाला

भव्य किती डोलारा झाला 


शाबुत आहे छप्पर अजुनी 

खूप दयाळू वारा झाला 


अश्रू ठिबकत नाहित हल्ली 

हृदयावर बंधारा झाला


रोज नवी पुरवितोच इच्छा 

मन हा तुटका तारा झाला


पारावर तरुणाई गायब 

गाव अता म्हातारा झाला


इथे राहतो का परमेश्वर?

प्रश्नांकित गाभारा झाला


३. 


सुखाऐवजी माझ्यावर दु:खांचा मारा केला

आयुष्याने वेळोवेळी पाणउतारा केला


पुढे कधी लागेलच म्हणुनी जमवत गेलो सारे 

बघताबघता खूपच अस्ताव्यस्त पसारा केला


घालू शकलो नाही वेसण माझ्यामधल्या 'मी'ला

माझ्यापासुन कितीक वेळा 'मी' पोबारा केला


गंमत म्हणून आवेशात बरळले त्याने काही 

सर्वांनी त्या वाक्याचा सोयीस्कर नारा केला


अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला होता माझा 

स्वत:स वाचविण्यासाठी निर्माण दरारा केला


श्वास थांबला क्षणभर, तेंव्हा दणाणलेले धाबे  

मृत्यूनेही जाताजाता गूढ इशारा केला

......................................................................


No comments: