तीन गझला : अनिसा सिकंदर

 



१.


दुःख हलके होत जाते बोलण्याने

जीव गुदमरतो मनातच ठेवल्याने


वेळ येता, व्हायचे ते होत असते

कोणता पडतो फरक मन जाळल्याने


आज डोळ्यांना दिसे ते सत्य आहे

ना नफा गोष्टी जुनेऱ्या चिवडल्याने


डाव त्यांनी टाकले पेरून साखर

साधले काहीच ना मज गाळल्याने


ठेव तू विश्वास तुझिया मनगटावर

कोण झाला 'राव' हुंडा घेतल्याने


२.

 

नसून असतो सोबत आणिक काय पाहिजे 

जगते सुखास वेचत आणिक काय पाहिजे 


माणुसकीने जगी रहावे इतुकी इच्छा 

जगावे प्रेम वाटत आणिक काय पाहिजे


सत्यामध्ये भेट भलेही अशक्य आहे

स्वप्नी असतो भेटत आणिक काय पाहिजे


परित्यक्ता अन् विधवेलाही सन्मान येथे 

रुढी चालल्या मोडत आणिक काय पाहिजे 


प्रेमाने अन् आपुलकीने रहावे इथे 

अनिसाला या बाबत आणिक काय पाहिजे


३.


राहिला ना एकमेका भेटण्याला वेळ आता

अंतरीचे दु:ख थोडे समजण्याला वेळ आता


दूर झाले गुंफलेले बंध सारे जवळचेही

बंध प्रेमाचे कुणा ना जोडण्याला वेळ आता


घाव जखमांचे उरी या जाहलेले खोलवर पण

कोंडलेला श्वास नाही खोलण्याला वेळ आता


आदराने स्वाभिमानी वागणे सारे संपले

शब्द थोरांना दिलेला पाळण्याला वेळ आता


माय जाते बाप जातो नोकरीला रोजही तर

 बाल हट्टे त्या मुलांचे  पुरवण्याला वेळ आता


मायबापाने सहाला त्रास वाढवण्या मुलांना

लेकरांना राहिला ना बोलण्याला वेळ आता

.......................................................................

No comments: