.
१.
कुणा सत्कार मिळतो अन् कुणा उपहास वाट्याला
कुणाचे ताट भरलेले, कुणा ना घास वाट्याला
युगाची थोर भटकंती असावी कोरली भाळी
निरंतर धावणे आले तसे हमखास वाट्याला
मला भेटायला येतोस अन् परतूनही जातो
मलाही पाहिजे आहे तुझा रे श्वास वाट्याला
मलाही लागली प्रेमा तुला बिलगायची इच्छा
कशाला पाहिजे स्वप्नातला आभास वाट्याला
सुगंधाची प्रशंसा अन् फुलांची कौतुके झाली
पुन्हा नशिबात काट्याच्या उरे उपहास वाट्याला
ठरत आले इथे कायम प्रभावी दुःख सीतेचे
मुका वनवास येतो उर्मिलेच्या खास वाट्याला
२.
मी सुगंधाचा वसा जपला
अन् फुलांचा वारसा जपला
शुद्ध मी मन ठेवले माझे
स्वच्छ माझा आरसा जपला
जिंकण्या, डोळ्यांपुढे त्याने
हारलेला तो ससा जपला
राग घुटमळला मनाशी पण
द्वेष नाही फारसा जपला
कावळ्यांशी चालली स्पर्धा
कोकिळेनेही घसा जपला
माणसांनी कापल्या फांद्या
पाखरांनी भरवसा जपला
खूण प्रेमाची तुझी मिटली
अंतरी कायम ठसा जपला
लोक काहीही म्हणो आता,
तू जसा आहे तसा जपला!
आवडीने तू हिऱ्याला जप
मी स्वतःचा कोळसा जपला
३.
अजून संगर बाकी आहे मानलीस तू हार कशाला?
समोर छाती असताना मग पाठीवरती वार कशाला?
मंदिर, मस्जिद जागोजागी शोधून देव दिसला नाही
शोधत असतो दगडांमध्ये आपण हे आकार कशाला?
प्रेम भावना फारच सुंदर, पवित्र, व्यापक आहे म्हणतो
प्रेमाने जग करू आपले शब्दाला मग धार कशाला?
संस्काराची पायाभरणी नको व्हायला दूषित म्हणून
शिक्षण निर्मळ गंगा आहे मांडलास बाजार कशाला?
मी लेकीच्या हातात शस्त्र ही लेखणी दिली असताना
तुमच्या बोथट तलवारीचा जगण्याला आधार कशाला?
जागोजागी विवंचना ही पिच्छा काही सोडत नाही
अजून दैवा माझ्यावरती नियतीचा हा मार कशाला?
........................................................................
1 comment:
व्वाह... तिन्ही अप्रतिम.. 🙏
Post a Comment