१.
पेटला जर आठवांचा जाळ मित्रा
काळजाला तू जरा सांभाळ मित्रा
काढतो खपली कशाला वाळलेली
घाव हा भरतो मनाचा काळ मित्रा
ती सुखाने नांदते आहे घरी त्या
भेटणे आता तिला तू टाळ मित्रा
गाठ नाही भेट नाही पण तरीही
का जमाना घेत आहे आळ मित्रा
कर तिच्यासाठी करावे वाटते ते
माय बापाची नको आबाळ मित्रा
झिजविला कष्टात ज्याने देह सारा
एकदा बापास त्या कवटाळ मित्रा
२.
जो भुकेल्या माणसाचा घास झाला
भक्त देवाचा खरा तो खास झाला
एकदा तू जा मला भेटून आता
देह आहे हा क्षणाचा भास झाला
साथ माझी सोडली नाही कधीही
दुःख आता मित्र माझा खास झाला
कौतुकाला पात्र झाले राम सीता
उर्मिलेचा केवढा वनवास झाला
धर्म जाती पाळल्याने काय झाले?
एकतेच्या भावनेचा ऱ्हास झाला
टाकला मी जीव ओवाळून मित्रा
शेवटी याचाच मोठा त्रास झाला
प्राप्त झाले सुख खरे या जीवनाचे
देह जेव्हा विठ्ठलाचा दास झाला
३.
पेरलेल्या या पिकाला भाव आहे का?
शेत कसणे हा जुगारी डाव आहे का?
प्रेम, माया, स्नेह सारा आटला आता
सांग पूर्वीसारखा तो गाव आहे का?
सांग मित्रा ढाळतो अश्रू असे का तू
काळजाला खोल तुझ्या घाव आहे का
काळजी नाही जराही दीन दुबळ्यांची
गावचा नक्की खरा तो राव आहे का?
उच्च काही शूद्र काही निर्मिले कोणी
ईश्वरापाशी दुजा हा भाव आहे का?
......................................................
No comments:
Post a Comment