१.
जन्म चालला निघून आता वेळच नाही
घ्यावे थोडे जगून आता वेळच नाही
तुला समाजाच्या व्याधींना संपवायचे
ये लढ थोडे म्हणून आता वेळच नाही
सत्तेचे हे भूत आमच्या मानगुटीवर
नेते बसले टपून आता वेळच नाही
रक्तपिपासू रस्त्यांवरती सोड चालणे
बुद्धमार्ग घे धरून आता वेळच नाही
करुण व्हायचा युद्धामध्ये अंत जगाचा
अशोक घे तू करून आता वेळच नाही
वेळेपूर्वी सावध होणे फार चांगले
टाक पावले जपून आता वेळच नाही
वेळच नाही वेळच नाही म्हणता म्हणता
वेळ म्हणावी चिडून आता वेळच नाही
२.
हे आठवेना आज पण केव्हातरी ओलांडली
लोकांमुळे कळले मला मी पायरी ओलांडली
भाकड प्रथा होत्या जुन्या माझ्या घराच्या आतही
मी एवढी मोठी दरी माझ्या घरी ओलांडली
झाले इथे अन्याय तर कुठवर सहन करणार तू
आधी तुझ्याही रेष ही कोणीतरी ओलांडली
ती मंदिरे ते धर्मही नव्हते तुझे येथे कधी
शिक्षण बरे झाल्यामुळे तू ओसरी ओलांडली
तू स्पर्श केल्याने म्हणे ते गाव होते बाटले
गावात आता माणसांनी चाकरी ओलांडली
हा देश माझा आजही आहे इथे होता तसा
माझ्या तिरंग्याने जरी ही शंभरी ओलांडली
बदलेल का दुर्भाग्य हे, की जन्म शापित घेतला
ही वेस मृत्यूने इथे कायम जरी ओलांडली
३.
जशा या रोज कानावर उडूनी यायच्या अफवा
मलाही त्यातल्या काही खऱ्या वाटायच्या अफवा
शहर अफवेत बुडल्यावर कुणाला काय सत्याचे
कुणावर मोहिनी इतकी कशा घालायच्या अफवा
प्रवासाला निघालेले कुणी पक्षी असावे का?
जरासा काळ थांबूनी निघूनी जायच्या अफवा
कधी हा काळ सोनेरी असा आलाच नव्हता रे
बघाना चक्क माझ्याशी अशा बोलायच्या अफवा
जसा काळोख खोलीचा गडप होतो उजेडाने
तुझ्या-माझ्या मनामधल्या कधी या व्हायच्या अफवा?
..............................................................................
2 comments:
Mangesh सर आपल्या तीनही गझल वाचल्यात. फारच सुंदर शब्दरचना आहे. आपल्या शब्दांतून आपण समाजातील अनिष्ट चालीरीतीवर एक चपराक लगावली आहे. आपल्या काव्यातून आपण समाज प्रबोधनाचे कार्य करत आहात. अशीच शब्दसेवा आपल्या हातच्या लेखणीतून आणि अंतर्मनातील विचारातून घडत राहो. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
आपल्या या सुंदर अभिप्रायासाठी आपले अगदी मनापासून आभार
Post a Comment