दोन गझला : डॉ. यशवंत मस्के

 




१.

 

तोचतोपणा टाळू थोडा बदल करू चल 

आयुष्याचा प्रवास आपण सहल करू चल


हवा कुणाला मोठ्या घरचा पोकळवासा 

आनंदाने कुटीस अपुल्या महल करू चल


नको कुणाचे नकली पद अन् मानपान हा 

नाते अपुल्या मैत्रीचे ये अटल करू चल 


दार उघड हृदयाचे थोडे आत मला घे 

थंडीला मग घाम फोडू नवल करू चल


संशय शंका वाढवते हे मौन कदाचित 

बोल मोकळे मनास निर्मळ तरल करू चल


जमेल तितका सत्वगुणांचा विकास साधू

मिळणे नाही पुन्हा जन्म हा सफल करू चल


सांभाळू दर्जा शब्दांचा पदोपदी अन्

यशवंतासम जगणे म्हणजे गझल करू चल


२. 


वागू कसा कुठे अन् जाऊ कुणा जवळ मी

मज चूकभूल सांगा, आलो तुम्हाजवळ मी


तोऱ्यात काल गेली 'ती' श्रावणी नदीसम

डबक्यापरी उन्हाळी दडलो पुलाजवळ मी 


सोडून हात गेली अंधार दाटल्यावर 

पुसते पुन्हा कशाला बसतो कुणाजवळ मी 


जातो रुसून झोपी उठल्यास पण हवी ती 

विनवीत सावलीला करतो पुन्हा जवळ मी


नसले दिसत समर्पण वाती तुझे तरीपण 

जळता दिवा म्हणाला नसतो जगाजवळ मी 


जिंकायला मुला शिक चरणाजवळ बसूनी

झालो चुकून कौरव बसलो उशाजवळ मी


यमकाशिवाय रंगत माझ्या-तुझ्यात नाही 

सानी अपूर्ण गझले अडलो उल्याजवळ मी

.........................................................

1 comment:

Anonymous said...

Every word reflects experience
and every line carries the wisdom of life… Truly beautiful and meaningful writing! 🙏✨