तीन गझला : अपर्णा नैताम

 




१.

टाळल्या इच्छा कधी कुरवाळल्या इच्छा
मी मनाच्या आतल्या सांभाळल्या इच्छा

या सुखाचे गोडवे गाऊन झाल्यावर
मौन दुःखाच्या पुढे वाफाळल्या इच्छा

वास्तवाचे चार चटके भेटल्यावरती
अनुभवाने केवढ्या गंधाळल्या इच्छा

जीव प्रेमाने तुझ्या बहरून आल्यावर
आपसुक ओठांवरी रेंगाळल्या इच्छा...

रोज जगण्याच्या निनावी गोंधळामध्ये
मी स्वतःच्या आत केवळ जाळल्या इच्छा

२.

डाव तू आखून सारे वार केले
कोवळे काळीज माझे ठार केले

घेतले समजून कायम तू म्हणूनी
आज नात्याने उभे घरदार केले

मी उभी होते तुझ्याशी काळजीने
तूच माझ्यावाचुनी सणवार केले

गंध होता आपल्या भेटीस न्यारा
त्या स्मृतींनी आज मन बेजार केले

रात्रभर मी भांडले त्या काजव्यांशी
चांदण्यांनी पण मला लाचार केले

भेदल्या जखमा पुढेही काळजाला
मी स्वतःवर शेवटी उपचार केले

वाटले होते तुझे होणेच जगणे
या भ्रमांनी केवढे लाचार केले

सावली बनली तुझी प्रत्येक वेळी
तू उन्हाचे एवढे व्यापार केले

थांबले डोळे तुझ्या वाटेत केवळ
रोज आशेने नवे शृंगार केले

३.

जरा आज दुःखास हसवून बघते
कधी सावली ऊन होऊन बघते

किती दुःख आहे नदीच्या किनारी
जरा गाळ आतील उपसून बघते

उठे आर्त डोळ्यांत वादळ कधीचे
जशी रात्र चंद्रास हरवून बघते

उरी वेदनेचा जुना घाव आहे
पुन्हा लाघवी ठेच लावून बघते

कलेवर जळे शांत आतून इतके
कुणी पेरले श्वास उकरून बघते

अबोला मनाच्या किती खोल गेला
कुणी दुःख डोळ्यांत लपवून बघते

धुमसते धुरासारखे पत्र ओले
मुके हुंदके काय ऐकून बघते

जिथे क्षीण होते उन्हाची लकाकी
अपर्णा तिथे जीव जाळून बघते

.........................................

.

1 comment:

Anonymous said...

सुरेख आहेत तिन्हीं गज़ल ह्रदयाच्या आरपार जात आहे गज़ल!