● 'गझलकार' सीमोल्लंघन २६ प्रकाशन ●






______________________________________________


'गझलकार' सीमोल्लंघन २६ चे  प्रकाशन करताना ख्यातनाम अभिनेत्री चिन्मयी सुमित 

सोबत सल्लागार संपादक शाहीर सुरेशकुमार वैराळकर

PC : कीर्ती वैराळकर

_____________________________________________________________________________

● संपादकीय ●

निंदक नियरे राखिए


नमस्कार मित्र मैत्रिणींनो! 

'गझलकार' सीमोल्लंघन ह्या ऑनलाइन अंकाचे हे सतरावे वर्ष. २०२६ च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर हा अंक प्रकाशित करताना आनंद होतो आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात 'अलनिनो'च्या प्रकोपाने थैमान घातले आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थितीने सर्वसामान्यांचे हाल बेहाल केले आहेत. आपदग्रस्तांच्या सोबत आपल्या सर्वांच्या संवेदना आहेतच. असे असूनही दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गझलकार, अभ्यासकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. एकूण २२४  गझलकारांच्या ६४० गझला, १० गझलसंग्रहांचा आस्वादात्मक परिचय, गझलविषयक ६ लेख आणि ४ हझला या अंकात समाविष्ट आहेत.गझलेच्या अभ्यासक-संशोधकांना एकत्र उपलब्ध व्हावीत म्हणून  'गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र' या ग्रंथावर प्रतिष्ठित नियतकालिकात प्रसिद्ध झालेली जाणकारांची ९ परीक्षणे या अंकात वेगळा विभाग करून एकत्र दिली आहेत. मराठी गझलेच्या विकासाकरिता तंत्राच्या होणाऱ्या साधक-बाधक  चर्चेकरिता आपण सदैव स्वागतशील असावे. 'काफियाचा दोष नव्हे 'हुस्न ए ईता' या हेमंत पुणेकर यांच्या लेखाचा विचार त्याच दृष्टीने करावा. गझलेच्या अवकाशात स्वच्छंदपणे विहरणारा एक पक्षी गझलकार रुपेश देशमुख आपल्याला सोडून गेला. त्याचीही नोंद  'श्रद्धांजली' या सदरात घेतली आहे. नेहमीप्रमाणेच महिला गझलकारांची संख्या पुरुष गझलकारांच्या तुलनेत लक्षणीय आहे. प्राप्त झालेल्या गझलांपैकी निवडक गझला या अंकात प्रकाशित केल्या आहेत. त्यांचा आस्वाद घ्यावा, प्रतिक्रिया द्याव्यात. 

गझल म्हणजे वृत्ताच्या साच्यात नुसती शब्दांची जुळवणी नसते तर अंतरात्म्याच्या संवेदना, वर्षानुवर्षांपासून अंतःगर्भात साठवून ठेवलेले अनुभव आणि स्वतःचा स्वतःशी चाललेला अखंड संवाद असतो. हाच संवाद जेव्हा शब्दरूप घेऊ लागतो तेव्हा जन्मास येते ती गझल. कविता असो वा गझल, प्रत्येक कवी त्याचे भावविश्व, निरंतर चालू असलेले चिंतन आणि कल्पनाशक्तीच्या माध्यमातून साहित्यरूपाने अभिव्यक्त होत असतो. कवींची-साहित्यिकांची सारी संपत्ती म्हणजे त्यांनी निर्माण केलेले शब्दरूपी साहित्यच होय. म्हणूनच शब्दांबद्दल आणि शब्दांमुळे येणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल प्रत्येकाने निश्चितच जागरूक राहायला हवे. आपल्या संतांनी शब्दाला किती महत्त्व दिले होते हे जगद्गुरू तुकोबारायांच्या शब्दांत बघा-

आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू ॥

शब्दचि आमुच्या जिवाचे जीवन । शब्दे वाटू धन जनलोकां ॥

परंतु याच शब्दांपासून निर्माण झालेली साहित्यकृती जेंव्हा वाचकाच्या, रसिकाच्या समोर आली की, मग मात्र ती त्या साहित्यिकाची उरत नाही. वाचक-रसिक त्या साहित्यकृतीला आपल्या जीवनानुभवांच्या तराजूत तोलू लागतात. गझल असो वा कविता, मनाला भिडली की वाहवा अन् भिडली नाही तर नाराजी व्यक्त करू लागतात. कधी प्रतिक्रियेच्या तर कधी समीक्षेच्या माध्यमातून. अगदीच नापसंत असेल तर कधी टोकाची टीकाही त्या कवीला सहन करावी लागते. 

काही वर्षांपूर्वी अशा  टिप्पण्या, समीक्षा किंवा मते-मतांतरे पत्राच्या माध्यमातून संबंधित साहित्यिकास पाठवली जायची. तर कधी नियतकालिकांतून, संमेलनांतून किंवा चर्चासत्रांतून मांडली जायची. तिला वेळ लागायचा आणि उत्तर द्यायलाही वेळ मिळायचा. परंतु आज ती परिस्थिती नाही. फेसबुक, इंस्टाग्राम, ब्लॉग्ज, इत्यादी आंतरजाल आधारित समाजमाध्यमे अगदी मोफत उपलब्ध झालेली आहेत. कोणत्या प्रकाशकाकडे जाण्याची गरज नाही की व्याकरण तपासण्यासाठी दिवसेंदिवस वाट पाहण्याची गरज नाही. लिहून झाले की लगेच पोस्ट करणे आणि लाईक्स व पोस्टवर येणाऱ्या कॉमेंट्सची वाट पाहत बसणे. सारेच जलदगतीने. वाचक आणि रसिकांचेही असेच झाले. कवी ओळखीचा असला तर लगेच लाईक आणि कॉमेंट. ओळखीचा नसला किंवा नवोदित असला तर मात्र त्याची आणि त्याच्या साहित्यकृतीची चिरफाड. आज एक टिप्पणी क्षणात हजारो वाचकांपर्यंत पोहोचते. हे चांगलेच झाले. पण त्याबरोबर उतावळेपणा, पूर्वग्रह, व्यक्तिद्वेष आणि प्रसिद्धीची हावही मंचावर आली. त्यामुळे समाजमाध्यमांवर लिखाण प्रकशित करणाऱ्या अनेकांच्या नशिबी अपरिहार्यपणे टीका ही येतेच. मग साहित्यिकाला प्रश्न पडत असावा की, अशा टीका, टिप्पण्यांना किती महत्त्व द्यायचे? द्यायचे की नाही? का अगदीच दुर्लक्ष करायचे? आहेत ना सारेच प्रश्न गोंधळात टाकणारे? अशा वेळी टीकेला सामोरे कसे जावे, हा प्रश्न केवळ एका लेखकाच्या प्रतिष्ठेचा नाही तर एकूणच साहित्यिक संस्कृती किती प्रगल्भ आहे, याचीही ती कसोटी बनते.

बरेचदा अनेकांना आपल्या गझलेवर केलेली टिपण्णी नेमकी कोणत्या भावनेतून केली हेच कळत नाही. म्हणून त्यातील भेद समजून घ्यायला हवा. सर्वसाधारणपणे आपल्याला असे म्हणता येते की, टीका ही साहित्यकृतीतील दोष उजागर करते. तर समीक्षा मात्र साहित्यकृतीतील गुणदोषांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करते. याउलट निंदा-नालस्ती व्यक्तीला लक्ष्य करून तिच्या निर्मितीची जाणीवपूर्वक अवहेलना करते. तर काही महाभाग याहीपुढे जाऊन- दुसऱ्याला खाली खेचून जेंव्हा स्वतःचे मोठेपण सिद्ध करू पाहतात, तेंव्हा केला जातो तो पाणउतारा. 

गझलेचा आशय, त्यात वापरलेल्या प्रतिमा, प्रतीके, वृत्त, यमक, रदीफ-काफिया आणि शब्दप्रयोगातील अचूकता किंवा अभिव्यक्तीच्या मर्यादा यांवर बोलणे हा नक्कीच साहित्यिक संवादाचा भाग आहे. त्यावर टिपण्णी झाली तर त्यातून लेखकाला आपल्या उणिवा समजून येतात. पण साहित्यकृतीचे निमित्त करून कवीच्या वा लेखकाच्या व्यक्तिमत्त्वावर चिखलफेक करणे, त्याच्या शाब्दिक उपयोजनावर संशय घेणे किंवा उपहासाने त्याला कमी लेखणे, याला समीक्षा कशी म्हणावी? म्हणून 

टिप्पणीत काय म्हटले आहे हे जितके महत्त्वाचे, तितकेच ती कोणत्या स्वरूपात आली आहे हेही पाहणे गरजेचे आहे. म्हणून टीकेकडे शत्रू समजून बघण्याऐवजी आरसा समजून बघता येईल. याबाबत कबीर आपल्या दोह्यातून स्पष्ट सांगतात -


निंदक नियरे राखिए, आँगन कुटी छवाय ।

बिन पानी साबुन बिना, निर्मल करे सुभाय ॥


अर्थात विना पाणी, विना साबण निंदक आपला स्वभाव निर्मळ करतो. म्हणून त्याला आपण अंगणात झोपडी बांधून जवळ ठेवावे. मराठीतही ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ हे वचन याच आशयाने रूढ झाले आहे. माणसाने एक भान ठेवायला हवे. निंदक तेंव्हाच उपयोगी ठरतो जेव्हा त्याच्या बोलण्यात तथ्य असते. म्हणून निंदकाला जवळ तर ठेवायचे, पण त्याच्या निंदेला चाळणी स्वतःची स्वतः लावायची.

कवितेवर, गझलेवर प्रतिकूल टिप्पणी आली की लगेच उत्तर दिलेच पाहिजे, असा काही नियम नाही. दुखावलेल्या क्षणी दिलेले उत्तर अनेकदा मूळ कवितेपेक्षा जास्त वादग्रस्त ठरते. त्यासाठी थोडे थांबावे, सदसद्विवेक बुद्धी वापरावी. टिप्पणी पुन्हा वाचावी, तिच्यात काही तथ्य आहे का ते तपासावे आणि मग उत्तर द्यायचे की नाही ते ठरवावे. आपले मौन म्हणजे आपला पराभव नसतो, पण मौन राखणे म्हणजे शहाणपण आहे असेही नाही. टीकेत तथ्य असेल तर ते मान्य करण्याचा प्रामाणिकपणा हवा. आत्मविश्वास आणि आत्ममग्नता यात असणाऱ्या पुसटशा  रेषेला मोठे महत्त्व आहे. दुसऱ्याने दोष दाखवला म्हणून आपली प्रतिभा कमी होत नाही. उलट, तो दोष दूर करण्याची आपली तयारी आपल्यातील सर्जनशीलतेला कित्येक पटीने बळ देते. आपल्या लिखाणावर असलेले आपले प्रेम आंधळ्या आत्मसमर्थनात बदलू देऊ नये. सगळेच टीकाकार निर्दोष असतात असेही नाही. कधी व्यक्तिगत आवडीनिवडींना वस्तुनिष्ठ समीक्षेचा मुखवटा चढवलेला असतो. अनेकदा लेखकाची लोकप्रियता, त्याची वैचारिक भूमिका किंवा व्यक्तिगत संबंध हेच प्रतिक्रियेमागची खरी कारणे असतात. अशा वेळी कारणमीमांसा शोधण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा टीकेतले तथ्यात्मक अंश तपासणे जास्त फायद्याचे ठरते. टीका खरेच चुकीची असेल तर शांतपणे, मुद्द्यांनिशी आणि पुराव्यासह आपली बाजू मांडावी. उत्तर देताना महत्त्व व्यक्तीला नव्हे तर विचारांना द्यावे, हीच साहित्यिक सभ्यतेची खरी कसोटी आहे.

गझलेबाबत तर हा विवेक अधिकच गरजेचा आहे, कारण तिथे भावविश्व आणि तंत्र दोन्हीही सारखेच महत्त्वाचे असतात. आशयाच्या नावाखाली तंत्राकडे दुर्लक्ष करणे जितके चूक, तितकेच तांत्रिक काटेकोरपणाच्या हट्टापायी आशयाचे सौंदर्य नाकारणे अन्यायकारक. गझलेतील शेरांची समीक्षा करताना भावार्थ, भाषिक सामर्थ्य, प्रतिमासृष्टी आणि तंत्रशुद्धता यांचा समतोल विचार झाला पाहिजे. गझलेतील किंवा काव्यातील तांत्रिक त्रुटी दाखवणे म्हणजे कवीचा अपमान नव्हे. तर यावरून टीकाकाराची तुमच्या साहित्याप्रती असलेली अभिरुची आणि संवेदनशीलता दिसून येते.

कवीने, गझलकाराने आपल्या गझलेत उपरोध किंवा परखडपणा वापरू नये असे नाही. याउलट गझलेचे ते सौंदर्य आहे. पण भाषेतील आणि शब्दातील विवेक सुटता कामा नये.  समाजमाध्यमांवरच्या वादात ‘शेवटचा शब्द माझाच’ हा हट्ट धरला की चर्चेचे संवादीपण हरवते. संवाद हळूहळू अहंकाराची भाषा बोलू लागतो. मग साहित्यकृती मागे पडते आणि व्यक्तीदोष पुढे येतात. म्हणून प्रत्येक टिप्पणीवर, टीकेवर उत्तर लिहिण्यापूर्वी आपण स्वतःला विचारले पाहिजे की, माझे उत्तर चर्चा समृद्ध करणार आहे, की माझ्या दुखावलेल्या अहंकाराला दिलासा देणार आहे? म्हणून स्तुतीने हुरळून जाऊ नये आणि टीकेने खचून जाऊ नये. तुकोबा याच अलिप्ततेचा आग्रह धरतात आणि स्वतःशीच संवाद साधण्याचा मार्ग दाखवतात - तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणासी ॥

साहित्यनिर्मिती टाळ्यांसाठी सुरू केलेली यात्रा नसून जाणिवांचा शोध घेणारी अखंड साधना असते. टीका या वाटेवर कधी दिशा दाखवते, कधी अडथळा ठरते, तर कधी नुसता वाटेवरचा कोलाहल असते. कोणत्या आवाजातून मार्ग घ्यायचा आणि कोणता मागे सोडायचा, हे ज्याला कळते तोच लेखनाशी आणि स्वतःशी प्रामाणिक राहू शकतो. लिहित राहणारा आणि वाचत राहणारा साहित्यिक टीकेच्या पलीकडे जातो. टीकेला घाबरू नये, स्तुतीला भुलू नये, आणि आपल्या लेखणीला कोणत्याही प्रतिक्रियेची गुलाम होऊ देऊ नये. आपण टीकाकाराचे आभार मानावे -


'टीका करून त्यांनी आम्हास शुद्ध केले;

मानू हजार वेळा आभार निंदकांचे.'


अकोलास्थित सुप्रसिद्ध चित्रकार श्री. सतीश पिंपळे यांनी सुप्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या स्मृतींना उजाळा देणारे बोलके छायाचित्र मुखपृष्ठाकरिता उपलब्ध करून दिले. यांच्यासह सर्व गझलकार, गझलकारा, अभ्यासक यांच्या लेखन सहकार्याने हा अंक साकार होऊ शकला, याची नम्र जाणीव संपादकांना आहे. म्हणूनच प्रस्तुत अंकाला योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. आजतागायत ‘गझलकार सीमोल्लंघन'च्या सर्वच अंकांना जगभरातल्या मराठी गझल रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. याही वर्षी तो अपेक्षित आहे. सर्वांना सीमोल्लंघनाच्या-दीपावलीच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.



रेखाचित्र : श्रीधर अंभोरे 

______________________________________________

No comments: