.
नुकताच डोळा लागला, किंवा नसेलही. डोक्यात अख्खा मोहोळ घोंघावतंय. जागेपण की झोप हेही कळत नाही. इतक्या गोंगाटातही एक एकुलती माशी कानाभोवती भिनभिनतेय:
फिर कुछ इस दिल को बेकरारी है…
फिर – हे काही आजच नाही. काल, आज, पुन्हा, यातून सुटका नाही, बेकरारी है. क्षणभर झोप लागत नाही. जिवाला क़रार येईल असं औषध कुठेय? नुस्ती बेकरारी आहे. सीना जुया-ए-ज़ख़्म कारी है. आपल्याच नखांनी आपलंच काळीज कोरण्याचा नाद लागलाय.. अब ये भी नहीं ठीक कि हर दर्द मिटा दे, कुछ दर्द कलेजे से लगाने के लिए है. सीना जुया-ए-ज़ख़्म कारी है. काळजाला पुन्हा नव्या जखमांची आस लागलीय.. फिर..
फिर उसी बेवफ़ा पे मरते हैं, फिर वही ज़िंदगी हमारी है..
हा फिर मात्र पीछा सोडत नाहीये. जुनं झालं ते सगळं.. भूतकाळ – लेता हूँ मक़तब-ए-ग़म-ए-दिल में सबक़ हनूज़, लेकिन यही कि रफ़्त गया और बूद था.. मक़तब-ए-ग़म-ए-दिल – दुःखी जिवाच्या शाळेत आता कितीही धडे गिरवतो म्हटलं तरी आता इतकंच उरलंय – रे फे ते- रफ़्त म्हणजे गेले – बे वाव दाद बूद म्हणजे होते. भूतकाळच कोरावा काळजावर..
यूँ उठे आह उस गली से हम, जैसे कोई जहाँ से उठता है..
एक साधी व्यक्ती जगाहून मोठी असावी? एक ही शख़्स था जहाँ में क्या? जिवाला चैन का पडत नसावे? त्या अंगणातून उठावं की जगातूनच उठून जावं? की उठूच नये? तिथेच डोकं आदळावं.. मौज-ए-ख़ूँ सर से गुज़र ही क्यों न जाए, आस्तान-ए-यार से उठ जाए क्या?
आणि उठून जावं तरी कुठे? आपलं तर हेच जग, हाच जीव. याशिवाय दुसरं जग मनाला रुचेल तरी काय? मक़ाम फ़ैज़ कोई राह में जँचा ही नहीं, जो कू-ए-यार से निकले तो सू-ए-दार चले.. की त्या अंगणातून उठावं आणि सरळ सुळाकडे चालत जावं..
हा सगळा गुंता आहे. ही गाठ आता सुटणे नाही. या ज़हमतवर उपाय शोधण्याच्या धडपडीत ही गाठ झिजून संपेल, तेच तिचं उलगडणं असेल कदाचित. दिल हुआ कशमकश-ए-चारा-ए-ज़हमत में तमाम, मिट गया घिसने में इस उक़्दा का वा हो जाना..
अर्धी रात्र उलटून गेली असेल, की पहाट होतेय? दीदनी है शिकस्तगी दिल की.. ही हार पाहण्याजोगी आहे.. क्या इमारत ग़मों ने ढाई है! पण या ढिगाऱ्यात आता हळवा जीव कुठे शोधावा? जल गया जिस्म जहाँ दिल भी जल गया होगा.. अवघी रात्र या कडेवरून त्या कडेवर.. दिवस उगवूच नये.. हे आकाशही अशाच एखाद्या अस्वस्थ आत्म्याचं थडगं असावं.. गोर किस दिलजले की है ये फ़लक, शोला इक सुबह याँ से उठता है.. ये धुआँ सा कहाँ से उठता है..
डोळ्याला डोळा लागेल कदाचित.. डोळ्यांसमोर नुस्ती दुःस्वप्नं फिरत राहतात. मी अंधाऱ्या गल्ल्यांमधून फिरत राहतो.. हा दरवेश मीर, हा आपल्याच नशेत चालणारा ग़ालिब, हा सिगरेटचा धूर सोडत ताठ मानेने निघालेला फ़ैज़.. ही खोल गर्ता.. त्यात आपण उतरतोय, की हा अनंत डोंगर ज्यावर आपण आपलंच ओझं वर ढकलत नेतोय.. शोरीदगी के हाथ से है सर वबाल-ए-दोश.. की हे अफाट वाळवंट? की एखादी भिंत आडोशाला नाही.. सहरा में ऐ ख़ुदा कोई दीवार भी नहीं. सावलीपुरती नाही, डोकं आदळायला ही नाही.
-------------------------------------------------------------------

No comments:
Post a Comment