तीन गझला : सुनील श्यामराव पोटे





१.


अंधाराला प्रकाश कळणे कठीण असते

दोघांमधली दरी मिटवणे कठीण असते 


दाह आतला जागव पोरी ज्वाला हो तू

अंगाराला हात लावणे कठीण असते


तरुणपणी ज्या चढायचे त्या चढ शिखरावर 

रक्त आटल्यावर धडपडणे कठीण असते


तारुण्याला ऐश्वर्याने वेढले तरी

वृद्धत्वाचा भार वाहणे कठीण असते


जीवन म्हणजे फुले हासरी वेलींवरची

सुकल्यानंतर पुन्हा फुलवणे कठीण असते


दोन हात कर परिस्थितीशी मर्दावानी

मरगळलेले दिवस ढकलणे कठीण असते


काट्यांनीही सैल सोडले हात तरीही

दु:ख कळ्यांचे दूर सारणे कठीण असते



२.


रात्रीलाही तुझी आठवण सोडत नाही 

झोपेची मग किनारसुद्धा मोडत नाही 


मुले लागली नाचू आता डोक्यावरती 

आई आता पाठ मुलांची फोडत नाही


फाटत येते देहाची त्या वही तरीही

माय मुलाचे नाव कधीही खोडत नाही 


पाय रोवुनी उभा राहतो जमिनीवरती

आकाशाशी नाते मी तर जोडत नाही


उन्हे झेलतो काट्यांनीही देह सजवतो

झाड तरीही हृदय फुलांचे तोडत नाही


३.


बंध तोडुनी जातीचे त्या येऊ शकलो नाही 

हात तुझा मी हातामध्ये घेऊ शकलो नाही


काळजातली करुणा माझ्या वाटे लयास गेली

घास मुखी त्या भुकेल्यास मी देऊ शकलो नाही 


चैनीसाठी पैशाच्या मी धावत सुटलो मागे

वेळ मुलांना अन् पत्नीला देऊ शकलो नाही


बाप म्हणोनी आभाळाला ठिगळे जोडत बसलो 

सणासुदीला नवीन कपडे लेऊ शकलो नाही


पराक्रमाने आकाशाचे अंगण केले ज्यांनी

त्या थोरांचा वसा पुढे मी नेऊ शकलो नाही

...................................................................



No comments: