तीन गझला : प्रियंका गिरी

 




१.


किती काळजावर चरे काय सांगू

तुझ्या आठवांनी दिले काय सांगू


जरा काय भिजली तिची चिंब काया

कुणी पावसावर जळे काय सांगू


तसा फार साधा तुझा प्रश्न होता

कळेना तरी नेमके काय सांगू 


जसा तू तशी मी जुना तू जुनी मी

तुझे तेच माझे नवे काय सांगू


न माझ्या मनाचा मला थांग लागे 

तुझ्या मी मनाचे कसे काय सांगू


सुखाची न लागो नजर हाय देवा

किती दुःखही देखणे काय सांगू


तुझे नाव प्रत्येक श्वासात माझ्या

हवे ते समज वेगळे काय सांगू



२.


चैन अताशा पडतच नाही

तुझा लळा की अजून काही 


डोळे मिटता आत मनाच्या

एक चांदणी जागत राही


तुला कदाचित स्पर्शुन आला

झोत बदलला वाऱ्याचाही


हात राहु दे असाच हाती

काय पाहिजे जगण्यालाही


तुझे नि माझे कसले नाते

कळले जर तर कळव मलाही


३.


किती मरावे जगण्यासाठी 

कुठे जरासे उरण्यासाठी 


तुझ्या अंगणी घिरट्या माझ्या 

तुला एकदा बघण्यासाठी 


रडत बसावे का हरल्यावर 

पुन्हा एकदा हरण्यासाठी 


किती जळावे किती झुरावे 

कुणी आपले असण्यासाठी 


रोज सकाळी सूर्य उगवतो 

सायंकाळी ढळण्यासाठी 


इवले जीवन हसून घ्यावे 

हसता हसता मरण्यासाठी 


कळले पण ना वळले काही 

जरा वळावे तरण्यासाठी

.................................................

No comments: