तीन गझला : आत्माराम मारुती कदम


 


१.


चेहरे तर हासरे होते

दु:ख त्यांचे बोचरे होते


वेदनेला माळले हृदयी

आसवांचे मग झरे होते


तू चितेवर झोपता मित्रा

या मनावरती चरे होते


का भिमेचा काठ बडबडला

बोल संतांचे खरे होते


भेटले मज दु:ख एकाकी

एकटे माझे बरे होते


२.


एक तारका नभी चमकते ती हसल्यावर

हृदयाचीही तार छेडते ती हसल्यावर


छमछम वाजे पैंजण पायी चालत जाता

गोड शिरशिरी मनी उमटते ती हसल्यावर


नको सखे तू लाजू आता चंद्र उगवला

चंद्र भाळला मला समजते ती हसल्यावर


आयुष्याची गणिते जेथे अडून बसली

त्या प्रश्नांचे उत्तर मिळते ती हसल्यावर


मला वाटले सावज फसले तिला बिलगता

शिकार झाली माझी कळते ती हसल्यावर


३.


ओसरल्यावर पाणी, जर्जर धरणी दिसली

हाय पावसा, तुझी अघोरी करणी दिसली


लहरत होती हिरवी शेते वाऱ्यावरती

लोळण घेउन पडली तुझ्याच चरणी दिसली


मीठ चोळती जखमेवरती शेतकऱ्यांच्या

खोटी तळमळ, नेत्यांची वरकरणी दिसली


अश्रू डोळी झाली होळी घराघरांची

गावोगावी भेदरलेली हरणी दिसली


अहंकार हा भरला आहे सत्तेमधला

खोटी आस्था शेतकऱ्यांच्या मरणी दिसली

..................................................................

1 comment:

Anonymous said...

आत्माराम जी, तीनही गझला एकदम झकास,
आवडल्या ....
त्यातल्या त्यात भीमेचा काठ, लाजलेला चंद्र तर खूपच मस्त ....