१.
संकटकाळी जाणुन बुजुन वाट वेगळी धरल्यावर
बिनकामाची कशास चर्चा तुझ्या नि माझ्या नात्यावर
गल्ली गल्ली ओस पडावी तसेच झाले गावाचे
थांबत नाही लालपरीपण तूच सासरी गेल्यावर
हिरवळ दिसता पहाट वेळी दवबिंदूची पुन्हा पुन्हा
जडावे तसे जडले होते मन गवताच्या पात्यावर
काय काय आठवते सांगू इतके होते तुझ्याविना
आठवण आठवणीसोबत झोके घेते सोफ्यावर
दोन दळाच्या वागणुकीचा काय फायदा कोणाला
दगा द्यायचा कसा कुणी वायदा एकदा केल्यावर
ओवी सुद्धा अता सुचेना सौख्यासाठी गरगरतो
अजून आता कितीक भरडू दु:ख असे मी जात्यावर
जुन्या जुन्या शब्दांचा माझ्या घोळ व्हायचा तो झाला
काय लिहू मी पुन्हा नव्याने ओळ तुझ्यावर सुचल्यावर
२.
खेळ होता की बिमारी काय ते ठरवा
ती लबाडी की हुशारी काय ते ठरवा
ही व्यवस्थाही गरोदर राहिली आहे
लागली बहुधा सिसारी काय ते ठरवा
या वगामधला पहा चुकवू नका शेवट
कोण तो राजा भिकारी काय ते ठरवा
वाढले आहे कशाचे एवढे ओझे
मोडले का स्तंभ चारी काय ते ठरवा
मर्द हो समजून घ्या नारीस एखाद्या
मग तिला अबला बिचारी काय ते ठरवा
३.
घेतल्याने सावली बिलगून सुद्धा
वागले नसते असे मग ऊन सुद्धा
पाखरांना रानच्या केले जवळ तर
दूर ते जातील का ढकलून सुद्धा
एकदा पक्का मनावर बिंबलेला
चेहरा नाही लपत लपवून सुद्धा
माय सासू, सासरा जो बाप होतो
त्या घराची लेक होते सून सुद्धा
पारखू शकतो मला कोणी कधीही
तोच मी बाहेर अन् आतून सुद्धा
मुल्य पाळा मानवी या जिंकण्याचे
फायदा नाही विजय होऊन सुद्धा
......................................................
No comments:
Post a Comment