१.
तुझ्या आतला शांत आवाज मी
निळा तूच सागर तुझी गाज मी
दिले तू मला भेटण्याचे वचन
इथे वाट पाहत उभी आज मी
तुझे प्रेम गेले दुधासम उतू
तरी संयमी राखला बाज मी
खऱ्या चेहऱ्याने तुला भावते
कशाला करू बावरा साज मी
सुखाने जराही कुठे माजले
असे दु:ख भवती घरंदाज मी
२.
विस्तवावर भाकरी भाजायची
माय जाळासारखी पेटायची
राहिलेला आज पाणवठा सुना
वेदना येथेच हलकी व्हायची
मी तिला पाहून गंधित व्हायचो
मोगऱ्याची ती फुले वेचायची
लावली आहेस इतकी ओढ तू
शक्यता आहे तुला भेटायची
वेदना जगण्यातली बोचायची
पण तरीही वाट तर चालायची
३.
तुझी साथ आई बरोबर असू दे
तुझ्या सावलीला असे घर असू दे
कसा शोध घेऊ मुक्या वेदनेचा
दिवा जाणिवांचा उजागर असू दे
कधी जर मनाला उगा मोह झाला
तुझे रूप कान्हा विटेवर असू दे
खरा नाद ओंकार कानी घुमावा
शिवा! भस्म हाती चिमुटभर असू दे
तुझ्या आठवांचे झरे बारमाही
मनी स्पंदनांचे सरोवर असू दे
. ............................................

No comments:
Post a Comment