१.
जीवनावर एवढे उपकार कर
दे क्षमा अन् हासरा संसार कर
राग अन् भांडण जुने विसरूनिया
प्रेम वेडी वर तुझ्या चिक्कार कर
जागत्या डोळ्यांत जी विरली सतत
तीच स्वप्ने नेमकी साकार कर
भर उन्ही चालून थकला मित्र जो
पाज पाणी त्यास आणिक गार कर
कोंडमारा फार आहे वाढला
बंद हृदयाचे अता तू दार कर
२.
विचार करुनी थकतो आहे माझा मेंदू
माझ्यावरती चिडतो आहे माझा मेंदू
गुदमरते, तडफडते, कुढते अन् चरफडते
व्याकुळ होउन रडतो आहे माझा मेंदू
कातरवेळी ऐकू येते हाक तयाची
दृष्टी लावुन बसतो आहे माझा मेंदू
परकी झाली नाती सुद्धा रक्ताची पण
फक्त त्यातुनी उरतो आहे माझा मेंदू
पारावरती गप्पाष्टकही रंगत नाही
आठवणींतच रमतो आहे माझा मेंदू
३.
का असा तू सारखा वादात येतो
बोलले थोडे तरी रागात येतो
केवढा पिडतो मनाला रोज माझ्या
जखम देऊनी पुन्हा प्रेमात येतो
दूर जातो तू मला सोडून मागे
सांजवेळी नेमका भासात येतो
कौतुके सारी जगाला सांगते मी
केवढा तू राजसा गर्वात येतो
मीच माहेरी कधी जाते रुसूनी
शोधण्यासाठी मला दारात येतो
..............................................
No comments:
Post a Comment