तीन गझला : सौ.सोनल मनोज गादेवार

 



१.


का अशी घेते निरंतर ती उगा झडती

घेत आहे का परीक्षा सारखी नियती


धावणे असते जरूरी धावते दुनिया 

पूर्ण करताना अपेक्षांच्या उभ्या चळती 


जायचे तर जा तुझ्या नशिबात नाही ती

ना अता घेणार बाजू ती कधी पडती


सूर्यदेवासारखा नाही गुरू कोणी

तो उजेडाची जगाला सांगतो महती


पेलते ती भार साऱ्या जीवसृष्टीचा

खंत ना करते कधीही माय ही धरती


पौर्णिमेचा चंद्र खुलतो त्या क्षणाला अन्

येत जाते सागराला आणखी भरती


हाच आहे स्वर्ग ज्याला शोधतो आपण

ना कधीही संपणारी पोकळी वरती


वाटते कोमेजलेली फार का जाई? 

तू नजर टाकून जाशिल एक ओझरती 

 

जन्मभर वणवण जिवाला शांतता नाही 

शेवटाला शांत जळते एकटी पणती


२.


सांगाल का कुठे ही माफक दरात मिळते 

माणूसकी जराशी आणेन आज म्हणते


काढून पाखरांच्या चोचीमधील दाणे

नियती कडू मनाने गालात मंद हसते


उतरायला नशा ही बिलकुल तयार नसते

कविता नव्या दमाने तेव्हा मला बिलगते


परतून यायचे मी ठरवून पाहते अन्

एकेक आठवण मग श्वासासवे उजळते


ठेवत कधीच नाही काळा तुझी उधारी

तू मागतोस ते मी व्याजासकट चुकवते


सांगायची गरज का? साऱ्या जगास कळते

जातो इगो लयाला धुंदी तशी उतरते


होते खुळी स्वतःशी संवाद साधताना 

अस्वस्थ भावनांचा गुंता गझल उकलते


चोहीकडे अचानक अंधार दाटल्यावर

मी आत्मचिंतनाने वाटा नव्या उजळते


मतभेद वाढले की आई कुशीत घेते

एका क्षणात भांडण बर्फासमान विरते


माझ्या तुझ्यात आता उरलेच काय आहे

केवळ जुन्या स्मृतींची पाने अजून स्मरते


आहे तशा रुढींचा स्वीकार का करावा

सोनल पिढीत नवख्या म्हणुनीच तर मिसळते 


३.


दुःखाची सल विरुनी जाते स्पर्शामध्ये

असते ना जादू आईच्या हातामध्ये


घट देहाचा घडवत जातो तो परमात्मा

अडकवतो ह्या संसाराच्या पाशामध्ये


चढणे असते अवघड वाटा आयुष्याच्या 

हळहळते मन जखमी होते काट्यामध्ये


यत्किंचितही जाणिव नसते येण्याआधी

जगणे करते मुश्किल माया... मोहामध्ये


विश्वासाने श्रद्धेने मी सजवत असते

आत्म्याचे हे निर्मळ मंदिर हृदयामध्ये


अन्यायाला फुटते वाचा त्या दरबारी 

नोंदत जातो ईश्वर सारे खात्यामध्ये


उपदेशाची भाषा जमते प्रत्येकाला

बसणे जाते मुश्किल नंतर साच्यामध्ये


विघटन होते नात्यांचे पण बघता बघता

मतभेदाचे जाळे उरते वाट्यामध्ये

 

नसते येथे कोणीही कोणाचे कायम

नात्यांचे आभासी मृगजळ डोळ्यामध्ये

.......................................................

No comments: