१.
विरहात आठवांनी जेव्हा उठाव केला
डोळ्यांत आसवांनी मोठा तलाव केला
संघर्ष जीवनाचा सोपा कधीच नसतो
पण आपल्या परीने आपण निभाव केला
स्वीकारले न खोटे आरोप लावल्यावर
राहून मौन मीही माझा बचाव केला
काढून केर सारा डोक्यातल्या स्मृतींचा
विसरायचा तुला मी थोडा सराव केला
टाकून पावलांना मागे फिरू कशाला?
चालायचे पुढे हा माझा स्वभाव केला
सत्यात भेटण्याचे साकारले कुठे मग
स्वप्नांत भेटण्याचा नंतर ठराव केला
कळतो कुठे हिरा अन् काचेतला फरक मग
खोटा जगापुढे जर त्याने बनाव केला
२.
नको नको त्या आठवणींनी पुन्हा येउनी छळू नये
कधी, कुठे अन् केव्हा यावे इतके त्यांना कळू नये?
हृदयामध्ये अंधाराला जागा नाही उरत कधी
आठवणींच्या लक्ष दिव्यांनी एका जागी जळू नये
हृदयाचे अन् या मेंदूचे केव्हा जमले सांगा ना?
सुयोग्य निर्णय घेण्यासाठी चित्त आपले ढळू नये
नको नको ते विषय काढुनी कधी फायदा होतो का?
उगाच कोणी दळण तेच ते पुन्हा पुन्हा मग दळू नये
आयुष्याच्या स्टीयरिंगवर तुमचा ताबा राहू द्या
मत लोकांचे ऐकून कधी गाडी मागे वळू नये
मृत्यूलाही हेवा व्हावा असे जगावे जीवनभर
हिरवाईच्या आशेवरती पानांनी पण गळू नये
आयुष्याची अवघड स्पर्धा सोपी होते धैर्याने
कासवाहुनी जास्त गतीने उगा सशाने पळू नये
३.
या प्रेमाच्या दुनियेने पण अजब गजब हा भास दिला
धरला होता विश्वासाने त्या हातांनी फास दिला
आठवले मी त्याला, ज्याला विसर म्हणाले माझे मन
नको नको त्या आठवणींनी क्षणाक्षणाला त्रास दिला
अपूर्ण इच्छा राहूच नये कुणी आपले गेल्यावर
पिंडावरल्या कावळ्यास त्या मी तृप्तीचा घास दिला
ओढ म्हणू का सवय लागली प्रेमात तिच्या असण्याची
बिलगून मला तिने सुगंधी श्वासालाही श्वास दिला
आखून दिले परीघात त्या फिरतच होते जीवनभर
आयुष्याचा केंद्र साधण्या सुख स्वप्नांचा व्यास दिला
कसे जगावे आयुष्याचा मंत्र सांगतो गुलमोहर
सोसून उन्हे वर फुलण्याचा जगा वेगळा ध्यास दिला
वैकुंठाला सदेह गेला तो नामाच्या योगाने
भावभक्तीची तरली गाथा तुक्यासारखा दास दिला
........................................................................
No comments:
Post a Comment