१.
नाही स्वतः स्वतःचे कळले भविष्य ज्यांना
मी दाखवू कशाला जाऊन हात त्यांना
फुलण्यात अर्थ असतो सांगाल काय नक्की
टोचून ओवलेल्या गजऱ्यातल्या कळ्यांना
गाथा बुडेल आता तुकया तुझी अशाने
भोंदू लुबाडतो जर सज्ञान माणसांना
शाळा कुठे न शिकले पण वाचतात पत्ते
कोठे पडायचे ते कळते कसे ढगांना?
खाऊन भाव जातो दारामधील नंदी
शंभू, तुझ्या अगोदर भेटून भाविकांना
सगळे लिहू म्हणाले वाचू कुणी म्हणेना
वाचक मिळेल आशा असतेच लेखकांना
आधी निदान करते उपचार त्याप्रमाणे
औषध कुठेच नसते नुसत्याच शक्यतांना
२.
काय ठेवले, कुठे ठेवले, मीच ठेवले, स्मरू किती!
रोज रोजची एकटीच मी आवरसावर करू किती!
साठीनंतर, साथ सोडती, अवयव सारे, असे कसे?
मेंदूचाही , रांजण गळका, पळी पळीने, भरू किती!
कलप लावुनी केसांना मी, फ्राॅक घातला नवा जरी,
आजोबाही आज्जी म्हणती, राग मनावर धरू किती!
"सुंदर दिसता आजही तुम्ही, वाटत नाही साठीच्या"
'प्रियकर माझा' म्हणे आरसा लाजू अन् मोहरू किती
नट्टापट्टा करून मीही, ठेका धरते नृत्याचा
सेल्फीवरही, सुखावणारी माझ्यावर मी मरू किती
३.
अंधश्रद्धा भोवताली
शिक्षणाची हार झाली
सभ्य ती आहेत का?,.. की
फक्त पांघरल्या दुशाली?
माणसे समजून गेले
श्वापदे तेथे निघाली
टाकला मेंदूत कचरा
लावली मग आग खाली
लादल्या चालीरिती अन्
वाहते मी त्या पखाली
फक्त माझे मीठ अळणी
एवढ्यातच जाण आली
नाव तर मजबूत होती
छेद केल्यावर बुडाली
..............................................
No comments:
Post a Comment