१.
पटो ना पटो प्रत्येकाचे असेच होते
इथे शेवटी आयुष्याचे धुकेच होते
मशाल धरुनी तत्त्वांची जो धावत असतो
अखेर त्याचे दुनियेमध्ये हसेच होते
उगा सारखे वाटत असते, सुटेल काही
कधी मनाचे घाबरणेही खरेच होते
हळूहळू स्मरणातुन धुरकट होतो आपण
पहाटेकडे जसे चांदणे फिकेच होते
नवी शरीरे, नवे चेहरे, जन्मही नवा
गेल्या जन्मातले श्वास तर इथेच होते
उभा ठाकला सवाल "अग्नी कुणी द्यायचा?"
लुळ्या करांचे जरी चेहरे बरेच होते
२.
काढीत माग आत्म्याचा खोलात भटकतो आहे
एकेक पायरी माझ्या मी आत उतरतो आहे
मन शांत शांत होताना उठतात वादळी लाटा
कुठला समुद्र हा माझ्या देहात उसळतो आहे
लक्षात स्पष्ट आलेले कारण उगाच हरण्याचे
माझ्यामधील माजाचे तण मीच उपटतो आहे
इतके दिवस कधी नाही धावून संकटी आला
पण थेंब थेंब तो हल्ली माझ्यात झिरपतो आहे
आकाश चालले आहे घेऊन पाखरे सारी
अन् एकटेपणा येथे पंखात पसरतो आहे
ठरवून खूपदा झाले 'आता निघायचे नक्की'
मग उंबऱ्यात क्षितिजाच्या का पाय अडकतो आहे?
३.
काल कुणी बाहेर मनाच्या पडले बहुधा
माझ्यामधले माझे असणे सरले बहुधा
ती गेल्यावर थांबलेच हालणे उराचे
श्वासांचे हृदयाशी नाते तुटले बहुधा
ऐकू येते अजूनही पैंजण अपरात्री
अंगणात पाऊल कुणाचे उरले बहुधा
हसायचाही प्रयास केला जमले नाही
गुणसूत्रातच जनुक व्यथेचे रुजले बहुधा
खोल आतुनी रडण्याचा आवाज कोवळा
दुःखाने दुःखाला नव्या प्रसवले बहुधा
रक्ताचा साकळलेला हा थेंब ठसठसे
स्वप्नांच्या दारातच बोट चिमटले बहुधा
फटीतुनी खिडकीच्या निघतो धूर कशाचा?
चुलीवरी दुनियेच्या कुणी करपले बहुधा
................................................................
No comments:
Post a Comment