तीन गझला : महेश मोरे

 



१.


ह्या भळभळत्या जखमेचे हे हृदय दिवाणे आहे 

हा घाव दिलेला एका नाजूक फुलाने आहे


मी मी म्हणणारा कोणी हे ठरवू शकला नाही 

कोणाच्या खांद्यावरुनी कोणाचे जाणे आहे


मी फक्त पुढे आलेल्या शब्दांच्या ओळी केल्या 

ही तुझी वेदना आहे... हे तुझेच गाणे आहे 


मानल्यास संधी आहे माणूस बनुन जगण्याची 

नसता श्वासांचे केवळ हे येणे-जाणे आहे 


कोणाच्या हृदयाला जर ही पाझर फोडू शकली 

तर गझल....'गझल' आहे ही अथवा रडगाणे आहे


२.


रस्त्यावरती भिरभिरणारा पाचोळा समजून मला

किती खुबीने दिलेस तूही वाऱ्यावर सोडून मला


नकार देउन निघून गेली दूर नभाच्या पलीकडे 

द्यायचाच धोका होता तर द्यायचास जवळून मला


पसंत नव्हते मला स्वतःचे अत्तरण्यासाठी सुकणे 

म्हणुन बहर ओसरण्याआधी मीच दिले उधळून मला


प्रेमामधली कटू आठवण चितारलेला कागद मी 

फाडा, फेका, जाळा अथवा टाका चुरगाळून मला


मरून जातिल माझ्यासोबत राहिलीच जर...जीवनभर 

अमर करा माझ्या स्वप्नांना कुणीतरी मारून मला


जन्म थांबला एका जागी ह्याच विचारामध्ये की 

जायचेच केवळ आहे हा रस्ता ओलांडून मला


प्रमेय, समिकरणांची गणिते...गृहीतके समजू आली

कळला नाही केवळ 'माणुस' पुस्तकात वाचून मला


३.


पापणी भरली परंतू ओघळू नाही दिली

वेदना माझी जगाला मी दिसू नाही दिली


वेदनेला येत राहिल गंध विरहाचा तुझ्या 

याचसाठी ही जखम मी भळभळू नाही दिली


मी अशा जादूगिरीने विरह होता सोसला 

चेहऱ्यावर रेघ साधी मी उठू नाही दिली 


त्या जगाने कापणी केली सुगीची नेमकी 

ज्या जगाने ओल बेन्याला मिळू नाही दिली


वेदनांची जन्मभर केली जरी पारायणे 

मी सुखाची एक ओंजळ दरवळू नाही दिली


घेतली जाणून माझ्या जिंदगीची वास्तवे

तू स्वतःची मात्र धडधड जाणवू नाही दिली


'माणसां'मध्ये म्हणूनच मोजला जातोय मी 

मी कुणाला जात माझी ओळखू नाही दिली

..................................................................

No comments: